औरंगाबाद : विधानसभेच्या निवडणुका दोन महिन्यांवर आल्या आहेत. निवडणुका तोंडावर आल्या असताना शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीकडून मुख्यमंत्रीपदाबाबत दावे-प्रतिदावे केले जात आहेत. गेल्या पावणे पाच वर्षांपासून युतीच्या नेत्यांमध्ये धुसफूस सुरू आहे. सरकारविरुद्ध सेनेकडून रोज प्रतिहल्ले होत आहेत. हे सर्व काही होत असले तरी शेवटी विजय मात्र युतीचाच अशी रणनीती युतीच्या नेत्यांकडून केली जात आहे.सेना-भाजपमधील भांडण म्हणजे लटुपुटूची लढाई असून, मुख्यमंत्रीपदावरून जनतेचे लक्ष आकर्षित करण्याचा प्रयत्न युतीकडून केला जात आहे.
विधानसभेच्या निवडणुका ऑक्टोबर महिन्यात होणार आहे. २०१४ मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुका शिवसेना आणि भाजपने स्वतंत्र्यपणे स्वबळावर लढल्या होत्या. यात भाजपचे १२२ वर सेनेचे ६५ आमदार निवडून आले होते. निवडणुकीनंतर भाजपने सेनेला न विचारताच सरकार स्थापन केले. पण काही महिन्यांनंतर सेना सत्तेत सहभागी झाली. सेना सत्तेत असली तरी दररोज दोघांमध्ये कुरबूर सुरू आहे.
सध्या सर्वच पक्षाकडून विधानसभेच्या निवडणुकीची तयारी सुरू आहे. शिवसेना आणि भाजपकडून ही तयारी सुरू आहेत. लोकसभा निवडणुकीत युतीला चांगले यश मिळाले. त्यामुळे यावेळी युतीच्या नेत्यांनी १८८ पैकी २२० जागांचे उद्दिष्ट ठरविले आहे. दोन्ही पक्षाकडून युती होणार असे सांगितले जात असले तरी मुख्यमंत्रीपदावरून मात्र दावे-प्रतिदावे केली जात आहे. शिवसेनेच्या वतीने मुख्यमंत्रीपदासाठी आदित्य ठाकरे यांचे नाव पुढे केले जात आहे. तर भाजपच्या नेत्यांकडून भाजपचाच मुख्यमंत्री होणार असे सांगितले जात आहे. विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढचा मुख्यमंत्री युतीचाच होणार असून, मीच मुख्यमंत्री होणार असून, मी युतीचा मुख्यमंत्री राहणार आहे, असे सांगून कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले. गेल्या पावणे पाच वर्षांत युतीमध्ये कोणत्या ना कोणत्या मुद्द्यावरून कुरबूर होते. सत्तेत असूनही भाजपवर व सरकारच्या निर्णयाविरुद्ध टीकाटिपणी सेनेकडून केली जाते. हे पाहता सेना-भाजपचे भांडण हे ठरवून केलेली लुटुपुटूची लढाईच असल्याचे दिसते. तसेच कार्यकर्त्यांना पक्षाच्या कार्यात गुंतवून ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न दिसतात. त्यामुळे जततेने युतीतील नेत्यांच्या भांडणाकडे लक्ष न देता लोकसभा निवडणुकीत युतीलाच विजयी केले असे सत्ताधार्यांना वाटते;पण लोकसभा निवडणुकीत जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पाहून मतदान केले होते. आता राज्यात मात्र गेल्या पाच वर्षांत सरकारने केलेल्या कामाला पाहून मतदान होणार आहे. त्यामुळे युतीचे नेते जनतेचे लक्ष आपल्याकडे खेचण्यासाठी हे नाटक करीत असल्याचे बोलले जात आहे.